कृत्रिम बुद्धिमत्ता वर आधारित बुद्धि कितपत सुरक्षित व प्रगल्भ ?

ज्या प्रमाणे एक चालक चुक करतो व वाहनावरील ताबा गमावतो त्या वेळी अपघात कमी जास्त तिव्रतेचा व नुकसानीचा असतो . किंवा ज्या प्रमाणे ज्याला वाहन चालवण्याचे ज्ञानच नाही अशांच्या हातात वाहनाचे नियंत्रण गेल्यावर जसा कमी जास्त नुकसानीचा धोका निर्माण होतो त्याच प्रमाणे आजकाल जो ट्रेंड चालू आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचा ( AI ) ती कृत्रिम बुद्धिमत्ता वर अधारित बुद्धी कितपत सुरक्षित व प्रगल्भ ? असेल . यात आणखी भर म्हणजे या तंत्रज्ञानाच्या पुढिल आवृत्या येऊ घातल्या आहेत . सर्वसाधारण कृत्रिम बुद्धिमत्ता ( आर्टिफिशयल जनरल इंटेलिजन्स ) ( AGI ) आणि अत्योच्च कृत्रिम बुद्धिमत्ता ( आर्टिफिशयल सुपर इंटेलिजंस ) ( ASI ) . या सर्वांवर आपल्या नैसर्गिक बुद्धिमत्तेने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात .
काही वर्षांपूर्वी मी माझ्या एका वनस्पती शास्त्राचा विद्यार्थी असणाऱ्या मित्राला म्हणालो होतो की वनस्पतींना उगवणे वाढवणे व जगवणे हे जमिनी शिवाय माती शिवाय ही शक्य होईल . त्यावेळी त्या मित्राने मला हसून ती गोष्ट नाकारत माझी जवळ जवळ खिल्ली उडवली होती . सहाजिकच आहे , भारतात काही दशकांपुर्वी (७० वा ८० च्या दशकात ) मोबाईलची कल्पना बोलून दाखवली असती की, शेतातून सरळ दिल्लीला कृषीमंत्री महोदयांना संपर्क करून संवाद साधने शक्य आहे तर ते उपहासात्मकच झाले असते . नंतर काही वर्षांनी हायड्रोपोनिक्स , फॉगोपोनिक्स प्रकार उदयाला आले . मग त्या वनस्पतीशास्त्रज्ञाला मला आठवण करून द्यावी लागली की मी पुर्वी हे सांगितले होते ते आता अस्तित्वात आले .
त्याच प्रमाणे पुढील लिखाण व या लेखांची श्रंखला आपणांस हास्यास्पद व उपहास करावा अशी वाटू शकते . मात्र या सर्व गोष्टी अस्तित्वात येणाऱ्या आहेत .
कृत्रिम बुधिमत्ता ( AI ) गरज
यात शंका नाही की सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान हे जिज्ञासा मुळे संशोधक असतील वा सामान्यजन सर्वांच्या आवडीचा विषय आहे . एक असे गौडबंगालिय ( परिणामां पासून अनभिज्ञ ) आकर्षण की याचा परिणाम किंवा हे आपल्याला कोठे घेऊन जाणार याचा काही मागमूस नाहिये .
मायक्रोसॉफ्टचे को-पायलट , गुगलचे जेमिनी किंवा चॅटजीपीटी अथवा डीपसीक असेल व अनेक या पद्धतीचे जे की कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे चालणारी सर्च इंजिन्स आहेत यांचा वापर आज-काल सर्रास केला जातोय . या सर्व तथाकथित माहितीच्या गदारोळात ती माहिती संभ्रमात टाकणारी किंवा तिची सत्यता याबाबत सध्या काहीच ठाम मत मांडू शकत नाही . मात्र खरी गंमत तर पुढे आहे ती म्हणजे या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सुधारित आवृत्ती AGI आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स (सर्वसाधारण कृत्रिम बुद्धिमत्ता ) आणि त्याच्याही पुढील ASI आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स (परमोच्च कृत्रिम बुद्धिमत्ता ) यांच्यावर विविध देशातील विविध संबंधित संस्था काम करत आहेत . या येऊ घातलेल्या आवृत्यांवर नंतर प्रकाश टाकू प्रथम AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता बाबत आणखी काही माहिती घेऊयात .
येथे उल्लेख केल्याप्रमाणे मानवी जीवन सुकर व सोपे बनन्या साठी जगामध्ये विविध शोध लावले जातात . विविध साधनांचा शोध लावला गेला . ती साधने काळानुसार अध्ययावत होत गेली . उदा. पुर्वी मुकपट व कृष्ण धवल चित्रपट असायचे . अध्ययावत तंत्रज्ञानाने ते आवाजासह रंगीत बनू लागले . आता तर इतके अध्ययावत तंत्रज्ञानाने एखाद्या परिसरात वा वातावरणात आपण स्वःत भौतिक रीत्या त्यात आहोत असे अनुभव देणारे ३६० अंशात चित्रिकरण करण्यात आलेले चित्रपट व व्हिडीओ गेम आलेले आहेत .
तर हे एक अद्ययावत तंत्राचे उदाहरण दिले . पण याला काही मर्यादा होत्या , काही अडथळे होते . ते दुर करण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान किंवा त्या तंत्रज्ञानावर चालणारी साधनेच मानवाप्रमाणे विचार करणारी असली तर ? यातूनच कृत्रिम बुधिमत्ता ( AI ) चा उदय झाला . सर्च इंजिन्स नुसार कृत्रिम बुद्धिमत्ता चा उदय अधिकृत रीत्या १९५६ ला डार्टमाउथ परिषद ( कॉन्फरेंस ) न्यू हॅम्पशायर , अमेरिका येथे संगणक तंत्रज्ञ व गणितज्ञ यांच्यातील झालेल्या चर्चेतून जॉन मॅक् कार्थी यांच्या द्वारे भाषणातून झाला .
मग हे तर लक्षात येते की प्रत्येक सुख-सोई साठी ची साधने मानवा प्रमाणे विचार करून त्या नुसार सेवा द्यावी अशी संकल्पना किंवा मानवांच्या मेंदू प्रमाणे कार्य करणाऱ्या संगणक वा तत्सम साधनां कडून ज्ञान प्राप्त केले जावे अशी एक संकल्पना कृत्रिम बुध्दिमत्ता ( AI ) तंत्रज्ञानाच्या अस्तित्वात येण्याला कारणीभूत आहे . ही ( भासणारी ) किचकट खिचडी सांगण्याचे कारण की पुढील विषय लक्षात यावेत म्हणून .
भविष्य व AI तंत्रज्ञान
कल्पीत उदा० जर पाहिली तर AI तंत्रज्ञान काय करू शकेल याचा अंदाज येईल .
कल्पना करा की आपण AI तंत्रज्ञानाने युक्त असलेली मशिन ने दाढी करत आहोत तर ती फक्त दाढी करणार नाही तर सोबत आपली त्वचा कोरडी वा तेलकट झाली वा काही अनावश्यक बॅक्टेरिया (जीवाणू ) आढळले तर त्या बाबत ती स्वतः निर्णय घेत आपल्या त्वचेवर कार्य करेत .
सकाळी वापरला जाणारा कमोड आपल्या शरीरातील रोजचा लहानातील लहाना बदल पकडून आवश्यकता नुसार आपल्याला औषधी अथवा खानपानातील बदल सुचवेल नव्हे तशा सुचना अपल्या वैद्याला व खानसामा (आचारी ) ला देईल .
वाढत्या स्क्रिनटाईमचे दुष्परिणाम कमी करण्यात शरीरातील वा भावनिक बदल ओळखून त्यांना पुरक असे काम करेल .
अशी कितीतरी उदाहरणे पहाता येतील ते या लेखाच्या पुढील भागात पाहू .
एकंदरीत मनुष्याच्या मेंदूची क्षमता साधनांना चालवणाऱ्या तंत्रामध्ये आणणे हे प्रयोजन तर आपल्या लक्षात आले असेलच जेणेकरून आपल्याला सहाय्यभूत असणाऱ्या साधनांद्वारा कार्य सोपे होण्यास मदत होईल . जसे की वैद्यकिय क्षेत्रातील शस्त्रक्रिया साठीची व इतर ऑसिलोस्कोप सारखी साधने असतिल . शैक्षणिक, शेती , परिवहन सुरक्षा किंवा औद्यागिक अशी कितीतरी क्षेत्रे ज्या मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता ( AI ) तंत्रज्ञान वापरले जात आहे .
जे कार्य मानवास करणे शक्य नाही ज्या मध्ये मनुष्याकडून चुक होण्याची संभावना जास्त आहे अशा ठिकाणी विशेषतः उद्योग क्षेत्रातील वेल्डींग चे कार्य व खाण व्यवसाय मधित जड कामे किंवा अंतरळतील कार्य जेथे मनुष्य जीवनास पोषक वातावरण नसते . अशा ठिकाणी . विशेष करून माहिती विश्लेषण जेथे मानवी मेंदू ची क्षमता कमी भासते अशा ठिकाणी (बाजार , हवामान किंवा रोगराई चे भाकिते व अंदाज ) तर या तंत्रज्ञानामुळे क्रांती झाली आहे .

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI ) तंत्रज्ञान वापरत असलेली जगातील प्रचलित सर्च इंजिन चॅट GPT, डिपसीक, को-पायलट , जेमिनी , परप्लेक्झीटी , यू-चॅट Phind इत्यादी सर्वांची क्रेज व वापर दिवसें-दिवस वाढतच जात आहे .
कृत्रिम बुद्धिमत्ता ( AI ) तंत्राचा वापर सध्या सर्वात जास्त प्रमाणात शैक्षणिक क्षेत्रात ( ज्ञानार्जनासाठी ) दिसतो आहे तरी प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता ( AI ) तंत्रज्ञान अचुकता, गती व त्याप्ती मध्ये जबरदस्त बदल घडवून आणत आहे .
शेती मधिल पीकांवरील रोग तसेच हवामान खात्याने वर्तवलेले अंदाज आता अचुक वर्तवले जात आहेत . बियाणांचा संकर म्हणजे नविन वाण निर्मिती साठीचे माहिती विश्लेषण साठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान उत्तम कार्य करत आहे .
नाडी तंत्राच्या बिघाडामुळे असलेला ऑटिजम स्पेक्ट्रम डिसऑर्डर मध्ये उपचारासाठी हे AI तंत्रज्ञान फार मदत करत आहे .
वर उल्लेख केलेल्या प्रमाणे विशिष्ट कामापुरती बुद्धिमान असलेले हे कृत्रिम बुद्धीमत्ता ( AI ) तंत्रज्ञान खरोखरच मानवी जीवन सुकर होण्यास पुरक आहे ? की याचे काही दुष्परिणाम देखिल आहेत ?
जर असे असेल तर काय काय दुष्परिणाम असू शकतात ?
कृत्रिम बुद्धिमत्ता ( AI ) तंत्रज्ञानाने रोजगार प्रश्नाला आणखी तीव्रता येणार कारण या मुळे बऱ्याच नोकऱ्या कमी होणार परिणामी बेरोजगारी वाढणार .
माहिती विश्लेषक तर आता लागतील की नाही हा प्रश्न मोठा होत आहे . कारण ज्या ज्या क्षेत्रात डेटा एनालिसिस्ट आवश्यक होते त्या त्या ठीकाणी मानवी मेंदूच्या क्षमते पलीकडे जाऊन कत्रिम बुद्धीमत्ता (AI) तंत्रज्ञान जबर कार्य करत आहे .
ज्ञानार्जनाची भूक मिटवण्याच्या अधाशीपणा मुळे आपण खरोखर ज्ञान मिळवतो आहोत की आपल्या बुद्धीला गंज चढवत आहोत ?
कृत्रिम बुद्धिमत्ता ( AI ) तंत्रज्ञानावर आधारित असलेले मेंदू स्वतः ची क्षमता कमी करवून घेत नाहीत का ?
बुद्धिची प्रगल्भता परिपक्वता यांना या कृत्रिम बुद्धिमत्ता ( AI ) तंत्राने छोट्या वर्तुळामध्ये बंदिस्त केले नाही का ?
ज्या प्रमाणे मानवाने शेपटी चा वापर बंद केला तर ती काळानुसार लोप पावत गेली त्या प्रमाणे जर मानवाने बुद्धिचा वापर केलाच नाही तर तीची क्षमता संपुष्टात येणार नाही का ?
क्रमशः